अमृतानुभव – प्रकरण १०

ग्रंथपरिहार

परी गा श्रीनिवृत्तिराया । हातातळीं सुखविलें तूं या । तरी निवांतचि मियां । भोगावें कीं तें ॥ १०-१ ॥
परी महेशें सूर्याहातीं । दिधली तेजाची सुती । तया भासा अंतर्वर्ती । जगचि केलें ॥ १०-२ ॥
चंद्रासि अमृत घातलें । तें तयाचि कायि येतुलें । कीइं सिंधु मेघा दिधले । मेघाचि भागु ॥ १०-३ ॥
दिवा जो उजेडु । तो घराचाची सुरवाडू । गगनीं आथी पवाडु । तो जगाचाची कीं ॥ १०-४ ॥
अगाधेंहि उचंबळती । ते चंद्रीचि ना शक्ती ? । वसंतु करी तैं होती । झाडांचें दानीं ॥ १०-५ ॥
म्हणोनि हें असंवर्य । दैविकीचें औदार्य । वांचोनि स्वातंतर्य । माझें नाहीं ॥ १०-६ ॥
आणि हा येवढा ऐसा । परिहारु देवू कायसा । प्रभुप्रभावविन्यासा । आड ठावूनी ॥ १०-७ ॥
आम्ही बोलिलों जें कांहीं । तें प्रगटची असे ठायीं । मा स्वयंप्रकाशा काई । प्रकाशावें बोलें ? ॥ १०-८ ॥
नाना विपायें आम्हीं हन । कीजे तें पां मौन । तरी काय जनीं जन । दिसते ना ? ॥ १०-९ ॥
जनातें जनीं देखतां । द्रष्टेंचि दृश्य तत्वतां । कोण्ही नहोनि आइता । सिद्धांत हा ॥ १०-१० ॥
ययापरौतें कांहीं । संविद्रहस्य नाहीं । आणि हें तया आधींही । असतचि असे ॥ १०-११ ॥
तर्ही ग्रंथप्रस्तावो । न घडे हें म्हणों पावो । तर्ही सिद्धानुवाद लाहों । आवडी करूं ॥ १०-१२ ॥
पढियंतें सदा तेंचि । परी भोगीं नवी नवी रुची । म्हणोनि हा उचितुचि । अनुवाद सिद्ध ॥ १०-१३ ॥
या कारणें मियां । गौप्य दाविलें बोलूनियां । ऐसें नाहीं आपसया । प्रकाशुचि ॥ १०-१४ ॥
आणि पूर्णअहंता वेठलों । सैंघ आम्हीच दाटलों । मा लोपलों ना प्रगटलों । कोणा होऊनी । १०-१५ ॥
आपणया आपणपें । निरूपण काय ओपे ? । मा उगेपणे हरपे । ऐसे आहे ? ॥ १०-१६ ॥
म्हणोनि माझी वैखरी । मौनाचेंहि मौन करी । हे पाणियावरी मकरी । रेखिली पां ॥ १०-१७ ॥
एवं दशोपनिषदें । पुढारी न ढळती पदें । देखोनि बुडी बोधें । येथेंचि दिधली ॥ १०-१८ ॥
ज्ञानदेवो म्हणे श्रीमंत । हें अनुभवामृत । सेंवोनि जीवन्मुक्त । हेंचि होतु ॥ १०-१९ ॥
मुक्ति कीर वेल्हाळ । अनुभवामृत निखळ । परी अमृताही उठी लाळ । अमृतें येणें ॥ १०-२० ॥
नित्य चांदु होये । परी पुनवे आनु आहे । हें कां मी म्हणों लाहें । सूर्यदृष्टी ? ॥ १०-२१ ॥
प्रिया सावायिली होये । तै अंगीचे अंगीं न समाये । येर्हवीं तेथेंचि आहे । तारुण्य कीं ॥ १०-२२ ॥
वसंताचा आला । फळीं फुलीं आपला । गगनाचिया डाळा । पेलती झाडें ॥ १०-२३ ॥
ययालागीं हें बोलणें । अनुभामृतपणें । स्वानुभूति परगुणें । वोगरिलें ॥ १०-२४ ॥
आणि मुक्त मुमुक्षु बद्ध । हें तंववरी योग्यता भेद । अनुभामृतस्वाद । विरुद्ध जंव ॥ १०-२५ ॥
गंगावगाहना आली । पाणीयें गंगा झालीं । कां तिमिरें भेटलीं । सूर्या जैशीं ॥ १०-२६ ॥
नाहीं परिसाची कसवटी । तंववरीच वानियाच्या गोठी । मग पंधरावयाच्या पटीं । बैसावें कीं ॥ १०-२७ ॥
तैसें जे या अखरा । भेटती गाभारां । ते वोघ जैसे सागरा । आंतु आले ॥ १०-२८ ॥
जैशा आकारादि अक्षरा । भेटती पन्नासही मात्रा । तैसें या चराचरा । दुसरें नाहीं ॥ १०-२९ ॥
तैसी तये ईश्वरीं । अंगुळी नव्हेचि दुसरी । किंबहुना सरोभरीं शिवेसीचि ॥ १०-३० ॥
म्हणोनि ज्ञानदेवो म्हणे । अनुभवामृतें येणें । सणु भोगिजे सणें विश्वाचेनि ॥ १०-३१ ॥


॥ इति श्रीसिद्धानुवाद अनुभवामृते ग्रंथपरिहारकथनं नाम दशमं प्रकरणं संपूर्णम् ॥