अमृतानुभव – प्रकरण ०२

श्रीगुरुस्तवन

आतां उपायवनवसंतु । जो आज्ञेचा आहेवतंतु । अमूर्तचि परि मूर्तु । कारुण्याचा ॥ २-१ ॥
अविद्येचे आडवे । भुंजीत जीवपणाचे भवे । तया चैतन्याचे धांवे । कारुण्यें जो कीं ॥ २-२ ॥
मोडोनि मायाकुंजरु । मुक्तमोतियाचा वोगरु । जेवविता सद्गुरु । निवृत्ति वंदूं ॥ २-३ ॥
जयाचेनि अपांगपातें । बंध मोक्षपणीं आते । भेटे जाणतया जाणतें । जयापाशीं ॥ २-४ ॥
कैवल्यकनकाचिया दाना । जो न कडसी थोर साना । द्रष्ट्याचिया दर्शना । पाढाऊ जो ॥ २-५ ॥
सामर्थ्याचेनि बिकें । जो शिवाचेंही गुरुत्व जिंके । आत्मा आत्मसुख देखे । आरिसा जिये ॥ २-६ ॥
बोधचंद्रचिया कळा । विखुरलिया येकवळा । कृपापुनीवलीळा । करी जयाची ॥ २-७ ॥
जो भेटलियाचि सवे । पुरति उपायांचे धांवे । प्रवृत्ति-गंगा स्थिरावे । सागरीं जिये ॥ २-८ ॥
जयाचेनि अनवसरें । दृष्टाले दृश्याचें मोहिरें । जो भेटतखेंव सरे । बहुरुपचि हें ॥ २-९ ॥
अविद्येचें काळवखें । कीं स्वबोध सुदिनें फांके । सीतलें प्रसादार्कें । जयाचेंनि ॥ २-१० ॥
जयाचेनि कृपासलिलें । जीउ हा ठाववरी पाखाळे । जें शिवपणहि वोंविळें । अंगी न लवी ॥ २-११ ॥
राखों जातां शिष्यातें । गुरुपणहि धाडिलें थितें । तर्ही गुरुगौरव जयातें । सांडीचिना ॥ २-१२ ॥
एकपण नव्हे सुसास । म्हणोन गुरु-शिष्यांचें करोनि मिस । पाहणेंचि आपली वास । पाहतसे ॥ २-१३ ॥
जयाचेनि कृपातुषारें । परतलें अविद्येचें मोहिरें । परिणमे अपारें । बोधामृतें ॥ २-१४ ॥
वेद्या देतां मिठी । वेदकुहि सुये पोटीं । तर्ही नव्हेचि उशिटी । दिठी जयाची ॥ २-१५ ॥
जयाचेनि सावायें । जीवु ब्रह्म उपर लाहे । ब्रह्म तृणातळीं जाये । उदासे जेणें ॥ २-१६ ॥
उअपस्तिवरि राबतिया । उपाय फळीं येती मोडोनियां । वरिवंडले जयाचिया । अनुज्ञा कां ॥ २-१७ ॥
जयाचा दिठिवावसंतु । जंव न रिघे निगमवनाआंतु । तंव आपुलिये फळीं हातु । न घेपतिही ॥ २-१८ ॥
पुढें दृष्टीचेनि आलगें । खोंचि कीं निवटी मागें । येव्हडिया जैता नेघे । आपणपें जो ॥ २-१९ ॥
लघुत्वाचेनि मुद्दलें । बैसला गुरुत्वाचे शेले । नासूनि नाथिलें । सदैव जो ॥ २-२० ॥
नाहीं जे जळीं बुडिले । तै घनवटें जेणें तरिजे । जेणें तरलियाहि नुरिजे । कवणिये ठाईं ॥ २-२१ ॥
आकाश हे सावेव । न बंधे आकाशाची हांव । ऐसें कोण्ही येक भरीव । आकाश जो ॥ २-२२ ॥
चंद्रादि सुसीतळें । घडलीं जयाचेनि मेळें । सूर्य जयाचेनि उजाळें । कडवसोनि ॥ २-२३ ॥
जीवपणाचेनि त्रासें । यावया आपुलिये दशे । शिवही मुहूर्त पुसे । जया जोशियातें ॥ २-२४ ॥
चांदिणें स्वप्रकाशाचें । लेइला द्वैतदुणीचें । तर्ही उघडेपण नवचे । चांदाचें जया ॥ २-२५ ॥
जो उघड किं न दिसे । प्रकाश कीं न प्रकाशे । असतेपणेंचि नसे । कव्हणीकडे ॥ २-२६ ॥
आतां जो तो इहीं शब्दीं । कें मेळऊं अनुमानाची मांदी । हा प्रमाणाहि वो नेदी । कोण्हाहि मा ॥ २-२७ ॥
जेथें शब्दाची लिही पुसे । तेणेंसिं चावळों बैसे । दुजयाचा रागीं रुसे । येकपणा जो ॥ २-२८ ॥
प्रमाणापरि सरे । तैं प्रमेयचि आविष्करे । नवल मेचुं ये धुरे । नाहींपणाची ॥ २-२९ ॥
कांहींबाहीं अळुमाळु । देखिजे येखादे वेळु । तरी देखे तेहि विटाळु । जया गांवीं ॥ २-३० ॥
तेथें नमनें का बोलें। केउतीं सुयें पाउलें । आंगीं लाउनि नाडिलें । नांवचि येणें ॥ २-३१ ॥
नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ति । वाढवितां कें निवृत्ति ? । तरी या नामाचि वायबुंथी । सांडीचिना ॥ २-३२ ॥
निवर्त्य तंव नाहीं । मा निवर्तवी हा काई ? । तरि कैसा बैसे ठाईं । निवृत्ति-नामाच्या ? ॥ २-३३ ॥
सूर्यासि अंधकारु । कैं झाला होता गोचरु ? । तर्ही तमारि हा डगरु । आलाचि कीं ॥ २-३४ ॥
लटिकें येणें रूढे । जड येणें उजिवडे । न घडे तेंहि घडे । याचिया मावा ॥ २-३५ ॥
हां गा मायावशें दाविसी । तें मायिक म्हणोन वाळिसी । अमायिक तंव नव्हसी । कवणाहि विषो ॥ २-३६ ॥
शिवशिवा सद्गुरु । तुजला गूढा काय करूं ? । येकाहि निर्धारा धरूं । देतासि कां ? ॥ २-३७ ॥
नामें रूपें बहूवसें । उभारूनि पाडिलीं ओसें । सत्तेचेनि आवेशें । तोषलासि ना ? ॥ २-३८ ॥
जिउ घेतलिया उणे । चालों नेदिसी साजणें । भृत्यु उरे स्वामीपणें । तेंहि नव्हे ॥ २-३९ ॥
विशेषाचेनी नांवें । आत्मत्वही न साहावे । किंबहुना न व्हावें । कोण्हीच या ॥ २-४० ॥
राति नुरेचि सूर्या । नातरी लवण पाणिया । नुरेचि जेवी चेइलिया । नीद जैसी ॥ २-४१ ॥
कापुराचे थळीव । नुरेचि आगीची बरव । नुरेचि रूप नांव । तैसें यया ॥ २-४२ ॥
याच्या हातांपायां पडे । तरी वंद्यत्वें पुढें न मंडे । न पडेचि हा भिडे । भेदाचिये ॥ २-४३ ॥
आपणाप्रति रवी । उदो न करी जेवीं । हावंद्य नव्हें तेवीं । वंदनासी ॥ २-४४ ॥
कां समोरपण आपलें । न लाहिजे कांहीं केलें । तैसें वंद्यत्व घातलें । हारौनि येणें ॥ २-४५ ॥
आकाशाचाआरिसा । नुठे प्रतिबिंबाचा ठसा । हा वंद्य नव्हे तैसा । नमस्कारासी ॥ २-४६ ॥
परी नव्हे तरी नव्हो । हें वेखासें कां घेवो । परी वंदीतयाहि ठावो । उरों नेदी ॥ २-४७ ॥
आंगौनि येकुणा झोळु । फेडितांचि तो तरी बाहिरिळू । कडु फिटे आंतुलु । न फेडितांचि ॥ २-४८ ॥
नाना बिंबपणासरिसें । घेऊनि प्रतिबिंब नासे । नेलें वंद्यत्व येणें तैसें । वंदितेंनसीं ॥ २-४९ ॥
नाहीं रूपाचि जेथें सोये । तेथें दृष्टीचें कांहींचि नव्हे । आम्हां फळले हे पाये । ऐसिया दशा ॥ २-५० ॥
गुणा तेलाचिया सोयरिका । निर्वाहिली दीपकळिका । ते का होईल पुळिका । कापुराचिया ॥ २-५१ ॥
तया दोहों परस्परें । होय ना जंव मेळहैरें । तंव दोहीचेंही सरे । सरिसेंचि ॥ २-५२ ॥
तेविं देखेना कायी ययातें । तंव गेलें वंद्य वंदितें । चेइलिया कांतें । स्वप्नींचें जेवीं ॥ २-५३ ॥
किंबहुना इया भाखा । द्वैताचा जेथें उपखा । फेडोनियां स्वसखा । श्रीगुरु वंदिला ॥ २-५४ ॥
याच्या सख्याची नवाई । आंगीं एकपण रूप नाहीं । आणि गुरु-शिष्य दुबाळीही । पवाडु केला ॥ २-५५ ॥
कैसा आपणया आपण । दोंविण सोइरेपण । हा यहूनि विलक्षण । नाहींना नोहे ॥ २-५६ ॥
जग आघवें पोटीं माये । गगनायेव्हढे होऊनि ठाये । तेचि निशी साहे । नाहींपणाची ॥ २-५७ ॥
कां पूर्णते तरि आधारु । सिंधु जैसा दुर्भरु । तैसा विरुद्धेयां पाहुणेरु । याच्या घरीं ॥ २-५८ ॥
तेजा तमातें कांहीं । परस्परें निकें नाहीं । परि सूर्याच्या ठायीं । सूर्यचि असे ॥ २-५९ ॥
येक म्हणतां भेदें । तें कीं नानात्वें नांदे ? । विरुद्धें आपणया विरुद्धें । होती काइ ? ॥ २-६० ॥
म्हणौनि शिष्य आणि गुरुनाथु । या दोहों शब्दांचा अर्थु । श्रीगुरुचि परी होतु । दोहों ठायीं ॥ २-६१ ॥
कां सुवर्ण आणि लेणें । वसतें येकें सुवर्णें । वसतें चंद्र चांदणें । चंद्रींचि जेवीं ॥ २-६२ ॥
नाना कापुरु आणि परिमळु । कापुरचि केवळु । गोडी आणि गुळु । गुळुचि जेवीं ॥ २-६३ ॥
इतैसा गुरुशिष्यमिसें । हाचि येकु उल्हासे । जर्ही कांहीं दिसे । दोन्ही-पणें ॥ २-६४ ॥
आरिसा आणि मुखीं । मी दिसे हे उखी । आपुलिये ओळखी । जाणे मुख ॥ २-६५ ॥
पहापा निरंजनीं निदेला । तो हा निर्विवाद येकला । परि चेता चेवविता जाहला । दोन्ही तोचि ॥ २-६६ ॥
जे तोचि चेता तोचि चेववी । तेवीं हाचि बुझे हाचि बुझावी । गुरुशिष्यत्व नांदवी । ऐसेन हा ॥ २-६७ ॥
दर्पणेवीण डोळा । आपुले भेटीचा सोहळा । भोगितो तरि लीळा । सांगतों हें ॥ २-६८ ॥
एवं द्वैतासी उमसो । नेदि ऐक्यासी विसकुसों । सोईरिकीचा अतिसो । पोखितसे ॥ २-६९ ॥
निवृत्ति जया नांव । निवृत्ति जया बरव । जया निवृत्तीची राणीव । निवृत्तिचि ॥ २-७० ॥
वांचोनि प्रवृत्तिविरोधें । कां निवृत्तीचेंनि बोधें । आणिजे तैसा वादें । निवृत्ति नव्हे ॥ २-७१ ॥
आपणा देऊनि राती । दिवसा आणी उन्नति । प्रवृत्ति वारी निवृत्ति । नव्हे तैसा ॥ २-७२ ॥
वोपसरयाचें बळ । घेउनि मिरवे कीळ । तैसें रत्न नव्हे निखळ । चक्रवर्ती हा ॥ २-७३ ॥
गगनही सूनि पोटीं । जैं चंद्राची पघळे पुष्टी । तैं चांदिणें तेणेंसि उठी । आंग जयाचें ॥ २-७४ ॥
तैसें निवृत्तिपणासी कारण । हाचि आपणया आपण । घेयावया फुलचि झालें घ्राण । आपुली दृती ॥ २-७५ ॥
दिठी मुखाचिये बरवे । पाथीकडोनि जैं पावे । तैं आरिसे धांडोलावे । लागती काई ? ॥ २-७६ ॥
कीं राती हन गेलिया । दिवस हन पातलिया । काय सूर्यपण सूर्या । होआवें लागें ? ॥ २-७७ ॥
म्हणोनि बोध्य बोधोनि । घेपे प्रमाणें साधोनि । ऐसा नव्हे भरंवसेनि । गोसावी हा ॥ २-७८ ॥
ऐसें करणियावीण । स्वयंभचि जें निवृत्तिपण । तयाचे श्रीचरण । वंदिले ऐसे ॥ २-७९ ॥
आतां ज्ञानदेवो म्हणे । श्रीगुरु प्रणामें येणें । फेडिली वाचाऋणें । चौही वाचांचीं ॥ २-८० ॥


॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे गुरुस्तवनम् नाम द्वितीय प्रकरणं संपूर्णम् ॥