अमृतानुभव – प्रकरण ०१

शिवशक्तिसमावेशन

यदक्षरमनाख्येयमानंदमजमव्ययम् । श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये ॥ १ ॥
गुरुरित्याख्यया लोके साक्षाद्विद्याहि शांकरी । जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम् ॥ २ ॥
सार्द्धं केन च कस्यार्द्धं शिवयोः समरूपिणोः । ज्ञातुं न शक्यते लग्नमितिद्वैतच्छलान्मुहुः ॥ ३ ॥
अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयंतौ मिथस्तराम् । तौ वंदे जगतामाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये ॥ ४ ॥
मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये । क्षिणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे ॥ ५ ॥
ऐसी इयें निरुपाधिकें । जगाचीं जियें जनकें । तियें वंदिलीं मियां मूळिकें । देवोदेवी ॥ १-१ ॥
जो प्रियुचि प्राणेश्वरी । उलथे आवडीचे सरोभरीं । चारुस्थळीं येकाहारी । एकांगाची ॥ १-२ ॥
आवडीचेनि वेगें । येकयेकातें गिळिती अंगें । कीं द्वैताचेनि पांगें । उगळिते आहाती ॥ १-३ ॥
जे एकचि नव्हे एकसरें । दोघां दोनीपण नाहीं पुरें । काइ नेणों साकारें । स्वरूपें जियें ॥ १-४ ॥
कैसी स्वसुखाचि आळुकी । जे दोनीपण मिळोनि येकीं । नेदितीचि कवतिकीं । एकपण फुटों ॥ १-५ ॥
हा ठाववरी वोयोगभेडें । जें बाळ जगायेव्हढें । वियालीं परी न मोडे । दोघुलेपण ॥ १-६ ॥
आपुलिये आंगीं संसारा । देखिलिया चराचरा । परी नेदितीचि तिसरा । झोंक लागों ॥ १-७ ॥
जयां येक सत्तेचें बैसणें । दोघां येका प्रकाशाचें लेणें । जें अनादि येकपणें । नांदती दोघें ॥ १-८ ॥
भेदु लाजौनि आवडी । येकरसीं देत बुडी । जो भोगणया ठाव काढी । द्वैताचा जेथें ॥ १- ९ ॥
जेणें देवें संपूर्ण देवी । जियेविण कांहीं ना तो गोसावी । किंबहुना येकोपजीवी । येकयेकांची ॥ १-१० ॥
कैसा मेळु आला गोडिये । दोघें न माती जगीं इये । कीं परमाणुही माजीं उवायें । मांडलीं आहाती ॥ १-११ ॥
जिहीं येकयेकावीण । न कीजे तृणाचेंही निर्माण । जियें दोघें जिऊ प्राण । जियां दोघां ॥ १-१२ ॥
घरवातें मोटकीं दोघें । जैं गोसावी सेजे रिघे । तैं दंपत्यपणें जागे । स्वामिणी जे ॥ १-१३ ॥
जिया दोघांमाजीं येकादें । विपायें उमजलें होय निदे । तरी गरवात गिळूनि नुसुधें । कांहीं ना कीं ॥ १-१४ ॥
दोहों अंगाचिये आटणी । गिंवसीत आहाती येकपणीं । जाली भेदाचिया वाहाणी । आधाधीं जियें ॥ १-१५ ॥
विषो येकमेकांचीं जियें । जियें एकमेकांचीं विषइयें । जियें हीं दोघें सुखियें । जियें दोघें ॥ १-१६ ॥
स्त्रीपुरुष नामभेदें । शिवपण येकलें नांदे । जग सकळ आधाधें । पणें जिहीं ॥ १-१७ ॥
दो दांडीं एकि श्रुति । दोहों फुलीं एकी दृति । दोहों दिवीं दीप्ति । येकीचि जेवीं ॥ १-१८ ॥
दो ओठीं येकी गोठी । दो डोळां येकी दिठी । तेवीं दोघीं जिहीं सृष्टी । येकीच जेवीं ॥ १-१९ ॥
दाऊनि दोनीपण । येक रसाचें आरोगण । करीत आहे मेहूण । अनादि जे ॥ १-२० ॥
जे स्वामिचिया सत्ता । वीण असो नेणें पतिव्रता । जियेवीण सर्व कर्ता । कांहीं ना जो ॥ १-२१ ॥
जें कीं भाताराचें दिसणें । भातारुचि जियेचें ससणें । नेणिजती दोघेंजणें । निवडूं जिये ॥ १-२२ ॥
गोडी आणि गुळु । कापुरु आणि परिमळु । निवडूं जातां पांगुळु । निवाडु होये ॥ १-२३ ॥
समग्र दीप्ति घेतां । जेविं दीपुचि ये हातां । तेविं जियेचिया तत्त्वतां । शिवुचि लाभे ॥ १-२४ ॥
जैसी सूर्यीं मिरवे प्रभा । प्रभे सूर्यत्वचि गाभा । तैसी भेद गिळीत शोभा । येकचि जे ॥ १-२५ ॥
कां बिंब प्रतिबिंबा द्योतक । प्रतिबिंब बिंबा अनुमापक । तैसें द्वैतमिसें एक । बरवतसे ॥ १-२६ ॥
सर्व शून्याचा निष्कर्षु । जिया बाइला केला पुरुषु । जेणें दादुलेन सत्तविशेषु । शक्ति जाली ॥ १-२७ ॥
जिये प्राणेश्वरीवीण । शिवीहीं शिवपण । थारों न शके ते आपण । शिवें घडली ॥ १-२८ ॥
ऐश्वर्येंसी ईश्वरा । जियेचें आंग संसारा । आपण होऊन उभारा । आपणचि जे ॥ १-२९ ॥
पतीचेनि अरूपपणें । लाजोनि आंगाचें मिरवणें । केलें जगायेव्हढें लेणें । नामरूपाचें ॥ १-३० ॥
ऐक्याचाही दुष्काळा । बहुपणाचा सोहळा । जियें सदैवेचिया लिळा । दाखविला ॥ १-३१ ॥
आंगाचिया आटणिया । कांतु उवाया आणिला जिया । स्वसंकोचें प्रिया । रूढविली जेणें ॥ १-३२ ॥
जियेतें पाहावयाचिया लोभा । चढे दृष्ट्रत्वाचिया क्षोभा । जियेतें न देखतु उभा ॥ आंगचि सांडी ॥ १-३३ ॥
कांतेचिया भिडा । अवला होय जगायेव्हढा । आंगविला उघडा । जियेविण ॥ १-३४ ॥
जो हा ठावो मंदरूपें । उवायिलेपणेंचि हारपे । तो झाला जियेचेनि पडिपे । विश्वरूप ॥ १-३५ ॥
जिया चेवविला शिवु । वेद्याचे बोणें बहु । वाढि तेणेंसि जेऊं । धाला जो ॥ १-३६ ॥
निदैलेनि भातारें । जे विये चराचरें । जियेचा विसांवला नुरे । आंबुलेपणही ॥ १-३७ ॥
जंव कांतु लपो बैसे । तंव नेणिजे जिच्या दोषें । जियें दोघें आरिसे । जियां दोघां ॥ १-३८ ॥
जियेचेनि आंगलगें । आनंद आपणा आरोगूं लागे । सर्व भोक्तृत्वही नेघे । जियेविण कांहीं ॥ १-३९ ॥
जया प्रियाचें जें आंग । जो प्रियुचि जियेचें चांग । कालउनी दोन्ही भाग । जेवितें आहाति ॥ १-४० ॥
जैसि कां समिरेंसकट गति । कां सोनियासकट कांति । तैसे शिवेसिं शक्ति । अवघिचि जे ॥ १-४१ ॥
कां कस्तुरीसकट परिमळु । कां उष्मेसकट अनळु । तैसा शक्तींसिं केवळु । शिवुचि जो ॥ १-४२ ॥
राति आणि दिवो । पातलीं सूर्याचा ठावो । तैसीं आपुला साचि वावो । दोघेंही जियें ॥ १-४३ ॥
किंबहुना तियें । प्रणवाक्षरीं विरुढातियें । दशेचीही वैरियें । शिवुशक्ति ॥ १-४४ ॥
हें असो नामरूपाचा भेदसिरा । गिळित येकार्थाचा उजिरा । नमो त्या शिववोहरा । ज्ञानदेवु म्हणे ॥ १-४५ ॥
जया दोघांच्या आलिंगनीं । विरोनि गेली दोन्ही । आघवियाचि रजनी । दिठिचि जे ॥ १-४६ ॥
जयांच्या रूपनिर्धारीं । गेली परेसीं वैखरी । सिंधूसीं प्रळयनिरीं । गंगा जैशी ॥ १-४७ ॥
वायु चळबळेंशीं जिराला व्योमाचिये कुशीं । आटला प्रळयप्रकाशीं । सप्रभ भानु ॥ १-४८ ॥
तेवीं निहाळितां ययांते । गेले पाहणेंनसीं पाहतें । पुढती घरौतेंवरौतें । वंदिलीं तियें ॥ १-४९ ॥
जयांच्या वाहाणी । वेदकु वेद्याचें पाणी । न पिये पण सांडणी । आंगाचि करी ॥ १-५० ॥
तेथ मी नमस्करा । लागीं उरों दुसरा । तर्ही लिंगभेद पर्हा । जोडूं जावों ॥ १-५१ ॥
परि सोनेंनसिं दुजें । नव्हतु लेणें सोना भजे । हें नमन करणें माझें । तैसें आहे ॥ १-५२ ॥
सांगतां वाचेतें वाचा । ठाउ वाच्य वाचकाचा । पडतां काय भेदाचा । विटाळु होये ? ॥ १-५३ ॥
सिंधु आणि गंगेचि मिळणी । स्त्रीपुरुष नामाची मिरवणी । दिसतसे तरी काय पाणी । द्वैत होईल ? ॥ १-५४ ॥
पाहे पां भास्य भासकता । आपुला ठाईं दावितां । एकपण काय सविता । मोडितसे ? ॥ १-५५ ॥
चांदाचिया दोंदावरी । होत चांदणियाची विखुरी । काई उणें दीप्तीवरी । गिवसों पां दीपु ॥ १-५६ ॥
मोतियाची कीळ । होय मोतियावरी पांगुळ । आगळें निर्मळ । रूपा येकीं ? ॥ १-५७ ॥
मात्राचिया त्रिपुटिया । प्रणवु काइ केला चिरटिया ? । कीं ‘णकार’ तिरेघटिया । भेदवला काई ? ॥ १-५८ ॥
अहो ऐक्याचें मुद्दल न ढळे । आणि साजिरेपणाचा लाभु मिळे । तरि स्वतरंगाचीं मुकुळें । तुरंबु का पाणी ॥ १-५९ ॥
म्हणौनि भूतेशु अणि भवानी । वंदिली न करूनि सिनानि । मी रिघालों नमनीं । तें हें ऐसें ॥ १-६० ॥
दर्पणाचेनि त्यागें । प्रतिबिंब बिंबीं रिगे । कां बुडी दिजे तरंगें । वायूचा ठेला ॥ १-६१॥
नातरी नीदजातखेवों । पावे आपुला ठावो । तैशी बुद्धित्यागें देवीदेवो । वंदिली मिया ॥ १-६२ ॥
सांडूनि मीठपणाचा लोभु । मीठें सिंधुत्वाचा घेतला लाभु । तेविं अहं देऊनि शंभु । शांभवी झालों ॥ १-६३ ॥
शिवशक्तिसमावेशें । नमन केलें म्यां ऐसें । रंभागर्भ आकाशें । रिगाला जैसा । १-६४ ॥


॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे शिवशक्तिसमावेशनं नाम प्रथम प्रकरणं संपूर्णम् ॥