अमृतानुभव – प्रकरण ०४

ज्ञानाज्ञानभेदकथन

आतां अज्ञानाचेनि मारें । ज्ञान अभेदें वावरें । नीद साधोनि जागरें । नांदिजे जेवीं ॥ ४-१ ॥
कां दर्पणाचा निघाला । ऐक्यबोधु पहिला । मुख भोगी आपुला । आपणचि ॥ ४-२ ॥
ज्ञान जिया तिया परी । जगीं आत्मैक्य करी । तैं सुरिया खोचे सुरी । तैसें जालें ॥ ४-३ ॥
लावी आंत ठावूनि कोपट । तो साधी आपणया सकट । का बांधलया चोरट । मोटेमाजी ॥ ४-४ ॥
आगी पोतासाचेनि मिसें । आपणपें जाळिलें जैसें । ज्ञाना अज्ञाननाशें । तैसें जालें ॥ ४-५ ॥
अज्ञानाचा टेंका । नसतांही ज्ञानाधिका । फांके तंव उफखा । आपुला पडे ॥ ४-६ ॥
दशाही ते निमालिया । येणें जें उवाया । तें केवळ नाशावया । दीपाचे परी ॥ ४-७ ॥
उठणें कीं पडणें । कुचभाराचे कोण जाणे । फांकणें कीं सुकणें । जाउळाचें ॥ ४-८ ॥
तरंगाचें रूपा येणें । तयाचि नांव निमणें । कां विजूचें उदैजणें । तोचि अस्तु ॥ ४-९ ॥
तैसें पिऊनि अज्ञान । तंववरी वाढे ज्ञान । जंव आपुलें निधन । निःशेष साधे ॥ ४-१० ॥
जैसें कल्पांतीचें भरितें । स्थळाजळा दोहींतें । बुडविलिया आरौतें । राहोंचि नेणें ॥ ४-११ ॥
कीं विश्वाहि वेगळ । वाढे जैं सूर्यमंडळ । तैं तेज तम निखळ । तेंचि होय ॥ ४-१२ ॥
नाना नीद मारोनि । आपणपें हिरौनि । जागणें ठाके होवोनि । जागणेंचि ॥ ४-१३ ॥
तैसे अज्ञान आटोनियां । ज्ञान येतें उवाया । ज्ञानाज्ञान गिळूनियां । ज्ञानचि होय ॥ ४-१४ ॥
ते वेळीं पुनिवां भरे । ना अवसां सरे । ते चंद्रींचि उरे । सतरावी जैशी ॥ ४-१५ ॥
कां तेजांतरें नाटोपे । कोण्हे तमें न सिंपे । तें उपमेचें जाउपें । सूर्यचि होय ॥ ४-१६ ॥
म्हणोनि ज्ञानें उजळे । कां अज्ञानें रुळे । तैसें नव्हे निर्वाळें । ज्ञानमात्र जें ॥ ४-१७ ॥
परी ज्ञानमात्रें निखळें । तेंचि कीं तया कळें । काई देखिजे बुबुळें । बुबुळा जेवीं ? ॥ ४-१८ ॥
आकाश आपणया रिगे ? । कायी आगि आपणया लागे ? । आपला माथा वोळघें । आपण कोण्ही ? ॥ ४-१९ ॥
दिठि आपणया देखे ? । स्वादु आपणया चाखे ? । नादु आपलें आइकें ? । नादपण ॥ ४-२० ॥
सूर्य सूर्यासि विवळे ? । कां फळ आपणया फळे ? । परिमळु परिमळें । घेपतु असे ? ॥ ४-२१ ॥
तैसें आपणयां आपण । जाणतें नव्हे जाण । म्हणौनि ज्ञानपणेंवीण । ज्ञानमात्र जें ॥ ४-२२ ॥
आणि ज्ञान ऐसी सोये । ज्ञानपणेंचि जरी साहे । तरी अज्ञान हें नोहे ? । ज्ञानपणेंचि ॥ ४-२३ ॥
जैसें तेज जें आहे । तें अंधारें कीर नोहे । मा तेज जर्ही होये । तेजासी काईं ? ॥ ४-२४ ॥
तैसें असणें आणि नसणें । हें नाहीं जया होणें । आतां मिथ्या ऐसें येणें । बोलें गमे ॥ ४-२५ ॥
तरी कांहीं नाहीं सर्वथा । ऐसी जरी व्यवस्था । तरी नाहीं हे प्रथा । कवणासि पां ? ॥ ४-२६ ॥
शून्यसिद्धांतबोधु । कोणे सत्ता होये सिद्धु ? । नसता हा अपवादु । वस्तुसि जो ॥ ४-२७ ॥
माल्हवितां देवे । माल्हवितें जरी माल्हवे । तरी दीपु नाहीं हें फावे । कोणासि पां ॥ ४-२८ ॥
कीं निदेचेनि आलेंपणें । निदेलें तें जाय प्राणें । तरी नीद भली हें कोणें । जाणिजेल पां ? ॥ ४-२९ ॥
घटु घटपणें भासे । तद्भंगें भंगू आभासे । सर्वथा नाहीं तैं नसे । कोणें म्हणावें ? ॥ ४-३० ॥
म्हणोनि कांहीं नाहींपण । देखता नाहीं आपण । नोहूनि असवेंवीण । असणें जें ॥ ४-३१ ॥
परी आणिका कां आपणया । न पुरे विषो होआवया । म्हणोनि न असावया । कारण कीं ॥ ४-३२ ॥
जो निरंजनीं निदेला । तो आणिकीं नाहीं देखिला । आपुलाहि निमाला । आठउ तया ॥ ४-३३ । परी जिवें नाहीं नोहे । तैसें शुद्ध असणें आहे । हें बोलणें न साहे । असेनाहींचें ॥ ४-३४ ॥
दिठी आपणया मुरडे । तैं दिठीपणहि मोडे । परी नाहीं नोहे फुडे । तें जाणेचि ते ॥ ४-३५ ॥
कां काळा राहे काळवखा । तो आपणया ना आणिका । न चोजवे तर्ही आसिका । हा मी बाणे ॥ ४-३६ ॥
तैसे असणें कां नसणें । हें कांहींच मानुसवाणें । नसोनि असणें । ठाये ठावो ॥ ४-३७ ॥
निर्मळपणीं आपुळा । आकाशाचा संचु विराला । तो स्वयें असे पुढिला । कांहीं ना कीं ॥ ४-३८ ॥
कां आंगीं कीं निर्मळपणीं । हारपलिया पोखरणीं । हें आणिकावांचूनि पाणी । सगळेंचि आहे ॥ ४-३९ ॥
आपणा भागु तैसें । असणेंचि जें असे । आहे नाहीं ऐसें । सांडोनिया ॥ ४-४० ॥
निदेचें नाहींपण । निमालियाहि जागेंपण । असिजे कां नेण । कोणी न होऊनि जैसें ॥ ४-४१ ॥
कां भूमि कुंभ ठेविजे । तैं सकुंभता आपजे । तो नेलियां म्हणिजे । तेणेंवीण ॥ ४-४२ ॥
परी दोन्ही हे भाग । न शिवति भूमीचें आंग । ते वेळीं भूमि तैसें चांग । चोख जें असणें ॥ ४-४३ ॥


॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे ज्ञानाज्ञानभेदकथनं नाम चतुर्थ प्रकरणं संपूर्णम् ॥