अमृतानुभव – प्रकरण ०९

जीवन्मुक्तदशाकथन

आतां आमोद सुनास जालें । श्रुतीसि श्रवण रिघाले । आरिसे उठले । लोचनेसी ॥ ९-१ ॥
आपुलेनि समीरपणें । वेल्हावती विंजणें । कीं माथेचि चांफेपणें । बहकताती ॥ ९-२ ॥
जिव्हा लोधली रसें । कमळ सूर्यपणें विकाशे । चकोरचि जैसे । चंद्रमा झाले ॥ ९-३ ॥
फुलेंचि जालीं भ्रमर । तरुणीची झाली नर । जालें आपुलें शेजार । निद्राळुचि ॥ ९-४ ॥
दिठीवियाचा रवा । नागरु इया ठेवा । घडिला कां कोरिवां । परी जैसा ॥ ९-५ ॥
चूतांकूर झाले कोकिळ । आंगच झाले मलयानीळ । रस झाले सकळ । रसनावंत ॥ ९-६ ॥
तैसे भोग्य आणि भोक्ता । दिसे आणि देखता । हें सरलें अद्वैता । अफुटामाजीं ॥ ९-७ ॥
सेवंतेपणा बाहेरी । न निगताचि परी । पाती सहस्रवरी । उपलविजे ते ॥ ९-८ ॥
तैसें नव नवा अनुभवीं । वाजतां वाधावी । अक्रियेच्या गांवीं । नेणिजे तें ॥ ९-९ ॥
म्हणोनि विषयांचेनि नांवें । सूनि इंद्रियांचे थवे । सैंघ घेती धांवे । समोरही ॥ ९-१० ॥
परी आरिसा शिवे शिवे । तंव दिठीसी दिठी फावे । तैसे झाले धांवे । वृत्तीचे या ॥ ९-११ ॥
नाग मुदी कंकण । त्रिलिंगीं भेदली खूण । घेतां तरी सुवर्ण । घेईजे कीं ॥ ९-१२ ॥
वेंचूनि आणूं कल्लोळ । म्हणोन घापे करतळ । तेथें तरी निखळ । पाणीच फावे ॥ ९-१३ ॥
हातापाशीं स्पर्शु । डोळ्यापाशीं रूपसु । जिव्हेपाशीं मिठांशु । कोण्ही एकू ॥ ९-१४ ॥
तर्ही परिमळापरौतें । मिरवणें नाहीं कापुरातें । तेवीं बहुतांपरी स्फुरतें । तेंचि स्फुरे ॥ ९-१५ ॥
म्हणोनि शब्दादि पदार्थ । श्रोत्रादिकांचे हात । घ्यावया जेथ । उजू होती ॥ ९-१६ ॥
तेथे संबंधु होये न होये । तव इंद्रियांचें तें नोहे । मग असतेंचि आहे । संबंधु ना ॥ ९-१७ ॥
जिये पेरीं दिसती उशीं । तिये लाभती कीं रसीं । कांति जेवीं शशीं । पुनिवेचिया ॥ ९-१८ ॥
पडिलें चांदावरी चांदिणें । समुद्रीं झालें वरिषणें । विषयां करणें । भेटती तैशीं ॥ ९-१९ ॥
म्हणोन तोंडाआड पडे । तेंहि वाचा वावडे । परी समाधी न मोडे । मौनमुद्रेची ॥ ९-२० ॥
व्यापाराचे गाडे । मोडतांहि अपाडे । अक्रियेचें न मोडे । पाऊल केंही ॥ ९-२१ ॥
पसरूनि वृत्तीची वावे । दिठी रूपातें दे खेवें । परी साचाचेनि नांवे । कांहींचि न लभे ॥ ९-२२ ॥
तमातें घ्यावया । उचलूनी सहस्र बाहिया । शेवटीं रवी इया । हाचि जैसा ॥ ९-२३ ॥
स्वप्नींचिया विलासा । भेटईन या आशा । उठिला तंव जैसा । तोचि मा तो ॥ ९-२४ ॥
तैसा उदैलया निर्विषयें । ज्ञानी विषयी हों लाहे ? । तंव दोन्ही न होनी होये । काय नेणों ॥ ९-२५ ॥
चंद्र वेचूं गेला चांदिणें । तंव वेंचिलें काय कोणें । विऊनि वांझें स्मरणें । होतीं जैसी ॥ ९-२६ ॥
प्रत्याहारादि अंगीं । योगें आंग टेंकिलें योगीं । तो जाला इये मार्गी । दिहाचा चांदु ॥ ९-२७ ॥
येथ प्रवृत्ति बहुडे जिणें । अप्रवृत्तीसी वाधावणें । आतां प्रत्यङ्मुखपणें । प्रचारु दिसे ॥ ९-२८ ॥
द्वैतदशेचें आंगण । अद्वैत वोळगे आपण । भेद तंव तंव दुण । अभेदासी ॥ ९-२९ ॥
कैवल्याचा चढावा । करीत विषयसेवा । झाला भृत्य भज्य कालोवा । भक्तीच्या घरीं ॥ ९-३० ॥
घरामाजीं पायें । चालतां मार्गुही तोचि होये । ना बैसे तरी आहे । पावणेंचि ॥ ९-३१ ॥
तैसें भलतें करितां । येथें पाविजे कांहीं आतां । ऐसें नाहीं न करितां । ठाकिजेना ॥ ९-३२ ॥
आठवु आणि विसरु । तयातेंही घेऊं नेदी पसरु । दशेचा वेव्हारु । असाधारणु ॥ ९-३३ ॥
झाला स्वेच्छाचि विधि । स्वैर झाला समाधि । दशे ये मोक्षऋद्धि । बैसों घापे ॥ ९-३४ ॥
झाला देवोचि भक्तु । ठावोचि झाला पंथु । होऊनि ठेला एकांतु । विश्वचि हें ॥ ९-३५ ॥
भलतेउनि देवें । भलतेन भक्त होआवें । बैसला तेथें राणिवें । अकर्मु हा ॥ ९-३६ ॥
देवाचिया दाटणी । देऊळा झाली आटणी । देशकाळादि वाहाणीं । येईच ना ॥ ९-३७ ॥
देवीं देवोचि न माये / मा देवी कें अन्वयो आहे ? । येथ परिवारु बहूये । अघडता कीं ॥ ९-३८ ॥
ऐसियाहि स्वामीभृत्यसंबंधा । लागीं उठलीं श्रद्धा । तैं देवोचि नुसधा । कामविजे ॥ ९-३९ ॥
अवघिया उपचारा । जपध्यान निर्धारा । नाहीं आन संसारा । देवोवांचुनी ॥ ९-४० ॥
आतां देवातेंचि देवें । देववरी भजावें । अर्पणाचेनि नांवें । भलतिया ॥ ९-४१ ॥
पाहें पां आघवया । रुखा रुखचि यया । परी दुसरा नाहीं तया । विस्तार जेवीं ॥ ९-४२ ॥
देव देऊळ परिवारु । कीजे कोरुनि डोंगरु । तैसा भक्तीचा व्यवहारु । कां न व्हावा ? ॥ ९-४३ ॥
अओ मुगीं मुग जैसें । घेतां न घेतां नवल नसे । केलें देवपण तैसें । दोहीं परी ॥ ९-४४ ॥
अखतांचि देवता । अखतींचि असे न पूजितां । मा अखतीं काय आतां । पुजो जावी ॥ ९-४५ ॥
दीप्तीचीं लुगडीं । दीपकळिके तूं वेढी । हें न म्हणतां ते उघडी । ठाके काई ? ॥ ९-४६ ॥
कां चंद्रातें चंद्रिका । न म्हणिजे तूं लेकां । तर्ही तो असिका । तियाचि कीं ना ॥ ९-४७ ॥
आगीपण आगी । असतचि असे अंगीं । मा कासयालागीं । देणें न देणें ? ॥ ९-४८ ॥
म्हणोनि भजतां भजावें । मा न भजतां कय नव्हे ? । ऐसें नाहीं स्वभावें । श्रीशिवुचि असे ॥ ९-४९ ॥
अतां भक्ति अभक्ति । झालें ताट एके पातीं । कर्माकर्माचिया वाती । काल्हावूनियां ॥ ९-५० ॥
म्हणोनि उपनिषदें । दशे येति निंदे । निंदाचि विशदें । स्तोत्रें होती ॥ ९-५१ ॥
ना तरी निंदास्तुति । दोन्हीं मौनासाठीं जाती । मौनीं मौन आथी । न बोलतां बोली ॥ ९-५२ ॥
घालिता अव्हासव्हा पाय । शिवयात्राचि होतु जाय । शिवा गेलियाही नोहे । केंही जाणें ॥ ९-५३ ॥
चालणें आणि बैसक । दोन्ही मिळोनि एक । नोहे ऐसें कौतुक । इये ठायीं ॥ ९-५४ ॥
येर्हवीं आडोळलिया डोळा । शिवदर्शनाचा सोहळा । भोगिजे भलते वेळां । भलतेणें ॥ ९-५५ ॥
ना समोर दिसे शिवुही । परि देखिलें कांहीं नाहीं । देवभक्ता दोही । एकुचि पाडू ॥ ९-५६ ॥
आपणचि चेंडू सुटे । मग आपणया उपटे । तेणें उदळतां दाटे । आपणपांचि ॥ ९-५७ ॥
ऐसी जरी चेंडूफळी । देखिजे कां केव्हेळीं । तरी बोलिजे हे सरळी । प्रबुद्धाची ॥ ९-५८ ॥
कर्माचा हातु नलगे । ज्ञानाचेंही कांहीं न रिगे । ऐसीचि होतसे आंगें । उपास्ति हे ॥ ९-५९ ॥
निफजे ना निमे । आंगें आंग घुमे । सुखा सुख उपमे । देववेल यया ॥ ९-६० ॥
कोण्ही एक अकृत्रीम । भक्तीचें हें वर्म । योगज्ञानादिविश्राम । भूमिके हे ॥ ९-६१ ॥
आंगें कीर एक झालें । परी नामरूपाचे मासले । होते तेही आटले । हरिहर येथें ॥ ९-६२ ॥
अहो अर्धनारीनटेश्वरें । गिळित गिळित परस्परें । ग्रहण झालें एकसरें । सर्वग्रासें ॥ ९-६३ ॥
वाच्यजात खाऊनी । वाचकत्वहि पिऊनी । टाकली निदैजोनी । परा येथें ॥ ९-६४ ॥
शिवाशिवा ! समर्था स्वामी । येवढीये आनंदभूमि । घेपे दीजे एकें आम्हीं । ऐसें केलें ॥ ९-६५ ॥
चेतचि मा चेवविलें । निदैलेंचि मा निदविलें । आम्हीचि आम्हा आणिलें । नवल जी तुझें ॥ ९-६६ ॥
आम्ही निखळ मा तुझे । वरी लोभें म्हणसी माझें । हें पुनरुक्त साजे । तूंचि म्हणोनी ॥ ९-६७ ॥
कोणाचें कांहीं न घेसी । आपुलेंही तैसेंचि न देसी । कोण जाणे भोगिसी । गौरव कैसें ॥ ९-६८ ॥
गुरुत्वें जेवढा चांगु । तेवढाचि तारूनि लघु । गुरु लघु जाणे जो पांगु । तुझा करी ॥ ९-६९ ॥
शिष्यां देतां वाटे । अद्वैताचा समो फुटे । तरी काह्या होती भाटें । शास्त्रें तुझीं ॥ ९-७० ॥
किंबहुना ये दातारा । तूं याचा संसारा । वेंचोनि होसी सोयरा । तेणेंचि तोषें ॥ ९-७१ ॥


॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे जीवन्मुक्तदशाकथनं नाम नवमं प्रकरणं संपूर्णम् ॥