अमृतानुभव – प्रकरण ०७

अज्ञानखंडण

येर्हवीं तरी अज्ञाना । जैं ज्ञानाची नसे क्षोभणा । तैं तरि काना । खालींच दडे ॥ ७-१ ॥
अंडसोनि अंधारीं । खद्योत दीप्ति शिरी । तैसें लटिकेंवरी । अनादि होय ॥ ७-२ ॥
जैसी स्वप्ना स्वप्नीं महिमा । तमीं मानु असे तमा । तेवीं अज्ञाना गरिमा । अज्ञानींचि ॥ ७-३ ॥
कोल्हेरीचे वारु । न येती धारकीं धरूं । नये लेणा श्रृंगारूं । वोडंबरीचा ॥ ७-४ ॥
हें जाणणेयाच्या घरीं । खोंचिलेंहि आन न करी । काई चांदिणां उठे लहरी । मृगजळाची ? ॥ ७-५ ॥
आणि ज्ञान हें जें म्हणिजे । तें अज्ञानचि पां दुजें । येक लपऊनि दाविजे । येक नव्हे ? ॥ ७-६ ॥
असो आतां या प्रस्तावो । आधीं अज्ञानाचा धांडोळा घेवों । मग तयाच्या साचीं लाहो । ज्ञानचि लटिकें ॥ ७-७ ॥
या अज्ञान ज्ञानातें । आंगींचि आहे जितें । तरी जेथें असे तयातें । नेण कां न करी ? ॥ ७-८ ॥
अज्ञान जेथ असावें । तेणें सर्वनेण होआवें । ऐसी जाती स्वभावें । अज्ञानाची ॥ ७-९ ॥
तरी शास्त्रमत ऐसें । जे आत्माचि अज्ञान असे । तेणेचि तो गिंवसे । आश्रो जरी ॥ ७-१० ॥
तरी निठितां दुजें । जैं अज्ञान आहे बिजें । तैं तेचि आथी हे बुझे । कोण येथें ? ॥ ७-११ ॥
अज्ञान तंव आपणयातें । जडपणें नेणे निरुतें । आणि प्रमाण प्रमाणातें । होत आहे ? ॥ ७-१२ ॥
या लागिं जरी अज्ञान । करील आपुलें ज्ञान । हें म्हणत खेंवो घेववी मौन । विरोधुचि ॥ ७-१३ ॥
आणि जाणति वस्तु येक । ते येणें अज्ञानें कीजे मूर्ख । तैं अज्ञान हे लेख । कवण धरी ? ॥ ७-१४ ॥
अहो आपणयाहि पुरता । नेणु न करवे जाणता । तयातें अज्ञान म्हणतां । लाजिजे कीं ? ॥ ७-१५ ॥
आभाळें भानु ग्रासे । तैं आभाळ कोणें प्रकाशे ? । सुषुप्ती सुषुप्तया रुसे । तैं तेचि कोणा ? ॥ ७-१६ ॥
तैसें अज्ञान असे जेथें । तेंचि जरी अज्ञान आतें । तरी अज्ञान अज्ञानातें । नेणतां गेलें ॥ ७-१७ ॥
ना तरी अज्ञान येक घडे । हें जयास्तव निवडे । तें अज्ञान नव्हे फुडे । कोणे काळीं ॥ ७-१८ ॥
पडळही आथी डोळा । आणि डोळा नव्हे आंधळा । तरी आथी या पोकळा । बोलिया कीं ॥ ७-१९ ॥
इंधनाच्या आंगीं । खवळलेन आगी । तें न जळे तैं वाउगी । शक्तिचि ते ॥ ७-२० ॥
आंधारु कोंडुनि घरीं । घरा पडसायी न करी । तैं आंधार इहीं अक्षरीं । न म्हणावा कीं ? ॥ ७-२१ ॥
वो जावों नेदी जागणें । तये निदेतें नीद कोण म्हणे । दिवसा नाणी उणें । तैं रात्रिचि कैंची ॥ ७-२२ ॥
तैसें आत्मा अज्ञान असकें । असतां तो न मुके । तैं अज्ञान शब्दा लटिलें । आलेंच कीं ॥ ७-२३ ॥
येर्हवी तरी आत्मया । माजीं अज्ञान असावया । कारण म्हणतां न्यावा । चुकी येईल कीं ॥ ७-२४ ॥
अज्ञान तममेळणी । आत्मा प्रकाशाची खाणी । आतां दोहीं मिळणी । येकी कैसी ? ॥ ७-२५ ॥
स्वप्न आणि जागरु । आठउ आणि विसरु । इयें युग्में येका हारु । चालती जरी ॥ ७-२६ ॥
शीता तापा एकवट । वाहे वस्तीची वाट । कां तमें बांधिजे मोट । सूर्यरश्मींची ॥ ७-२७ ॥
नाना राती आणि दिवो । येती येके ठाईं राहों । तैं आत्मा जिवें जिवो । अज्ञानाचेनि ॥ ७-२८ ॥
हें असो मृत्यु आणि जिणें । इयें शोभती जरी मेहुणे । तरी आत्मेनि असणें । अज्ञानेंसि ॥ ७-२९ ॥
अहो आत्मेन जे बाधे । तेंचि आत्मेनसि नांदे ? । ऐसीं काईसीं विरुद्धें । बोलणीं इयें ॥ ७-३० ॥
अहो अंधारपणाची पैज । सांडूनी अंधार तेज । जाला तैं सहज । सूर्यचि निभ्रांत । ७-३१ ॥
दुलांकूडपण सांडलें । आणि आगीपण मांडिलें । तैं तेंचि आगी जालें । इंधन कीं ॥ ७-३२ ॥
का गंगा पावत खेंवो । आनपणाचा ठावो । सांडी तैं गंगा हो । लाहे पाणी ॥ ७-३३ ॥
तैसें अज्ञान हें अज्ञान नोहे । तरी आत्मा असकें असों लाहे । येर्हवीं अज्ञान होये । लागलाचि ॥ ७-३४ ॥
आत्मेनसी विरोधी । म्हणोनि नुरेचि इये संबंधीं । वेगळी तरी सिद्धि । जायेचिना ॥ ७-३५ ॥
लवणाची मासोळी । जरी जाली निवाळी । तरी जळीं ना जळावेगळी । न जिये जेवीं ॥ ७-३६ ॥
जें अज्ञान येथें नसे । तरीच आत्मा असे । म्हणोनि बोलणीं वाइसें । नायकावीं कीं ॥ ७-३७ ॥
दोरीं सर्पाभास होये । तो तेणें दोरें बांधों ये ? । ना दवडणें न साहे । जयापरी ॥ ७-३८ ॥
नाना पुनिवेचे आंधारें । दिहा भेणें रात्रीं महुरें । कीं येतांचि सुधाकरें । गिळिजे जेवीं ॥ ७-३९ ॥
तियापरी उभयतां । अज्ञान शब्द गेला वृथा । हा तर्कावांचूनि हाता । स्वरूपें नये ॥ ७-४० ॥
तरी अज्ञान स्वरूपें कैसें । काय कार्यानुमेय असे । कीं प्रत्यक्षचि दिसे । धांडोळूं आतां ॥ ७-४१ ॥
अहो प्रत्यक्षादि प्रमाणीं । कीजे जयाची घेणी । ते अज्ञानाची करणी । अज्ञान नव्हे ॥ ७-४२ ॥
जैसी अंकुरेंसी सरळ । वेली दिसे वेल्हाळ । तें बीज नव्हे केवळ । बीजकार्य होय ॥ ७-४३ ॥
कां शुभाशुभ रूपें । स्वप्नदृष्टी आरोपें । तें नीद नव्हे जाउपें । निदेचें कीं ॥ ७-४४ ॥
नाना चांदु एक असे । तो व्योमीं दुजा दिसे । तें तिमिरकार्य जैसें । तिमिर नव्हे ॥ ७-४५ ॥
तैसें प्रमाता प्रमेय । प्रमाण जें त्रय । तें अज्ञानाचें कार्य । अज्ञान नव्हे ॥ ७-४६ ॥
म्हणोनि प्रत्यक्षादिकीं । अज्ञान कार्यविशेखीं । नेघे तें असेये विखीं । आनु नाहीं ॥ ७-४७ ॥
अज्ञान कार्यपणें । घेइजे तें अज्ञान म्हणे । तरी घेतांहि करणें । तयाचेंची ॥ ७-४८ ॥
स्वप्नीं दिसे तें स्वप्न । मा देखता काय आन । तैसें कार्यचि अज्ञान । केवळ जरी ॥ ७-४९ ॥
तरी चाखिला गुळ गुळें । माखिलें काजळ काजळें । कां घेपे देपे शुळें । हालया सुळु ॥ ७-५० ॥
तैसें कारण अभिन्नपणें । कार्यही अज्ञान होणें । तें अज्ञानचि मा काय कोणें । घेपे देपे ॥ ७-५१ ॥
आतां घेतें घेइजेतें ऐसा । विचारु नये मानसा । तरी प्रमाण जाला मासा । मृगजळींचा ना ? ॥ ७-५२ ॥
तंव प्रमाणाचिया मापा । न संपडेचि जे बापा । तया आणि खपुष्पा । विशेषु काई ? ॥ ७-५३ ॥
मा हे प्रमाणचि नुरवी । आतां आथी हें कोण प्रस्तावी । येणें बोलें ही जाणावी । अज्ञानउखी ॥ ७-५४ ॥
एवं प्रत्यक्ष अनुमान । प्रमाणां भाजन । नहोनि जालें अज्ञान । अप्रमाण ॥ ७-५५ ॥
ना स्वकार्यातें विये । जें कारणपणा नये । मी अज्ञान ऐसें बिहे । मानूं साचें ॥ ७-५६ ॥
आत्मया स्वप्न दाऊं । न शके कीर बहू । परि ठायें ठाउ । निदेजउं नेणें ॥ ७-५७ ॥
हें असो जिये वेळे । आत्मपणेंचि निखळें । आत्मा अज्ञानमेळें । असे तेणें ॥ ७-५८ ॥
जैसें न करितां मंथन । काष्ठीं अवस्थान । जैसें कां हुताशन । सामर्थ्यांचें ॥ ७-५९ ॥
तैसें आत्मा ऐसें नांव । न साहे आत्मयाची बरव । तैं कांहीं अज्ञान हांव । बांधतें कां ? ॥ ७-६० ॥
काइ दीप जैं न लाविजे । तैंचि काजळी फेडिजे । कां नुगवत्या वाळिजे । रुखाची छाया ॥ ६१ ॥
नाना नुठितां देहदशा । कालऊनि लाविजे चिकसा । न घडितां आरिसा । उटिजे काई ॥ ६२ ॥
कां वोहाच्या दुधीं । सायचि असावी आधीं । मग ते फेडूं इये बुद्धी । पवाडु कीजे ॥ ७-६३ ॥
तैसें आत्मयाच्या ठाई । जैं आत्मपणा ठवो नाहीं । तैं अज्ञान कांहीं । सारिखें कैसें ॥ ७-६४ ॥
म्हणोनि तेव्हांही अज्ञान नसे । हें जालेंचि आहे आपैसें । आतां रिकामेंचि काइसें । नाहीं म्हणो ॥ ७-६५ ॥
ऐसाहि आत्मा जेव्हां । जैं नातळे भावाभावा । अज्ञान असे तेव्हां । तरी तें ऐसें ॥ ७-६६ ॥
जैसें घटाचें नाहींपण । फुटोनि होय शतचूर्ण । कीं सर्वांपरी मरण । मालवलें कीं ॥ ७-६७ ॥
नाना निदे नीद आली । कीं मूर्छां मूर्छें गेली । कीं आंधारी पडली । अंधकूपीं ॥ ७-६८ ॥
काअभाव अवघडला । का केळीचा गाभा मोडला । चोखळा आसुडला । आकाशाचा ॥ ७-६९ ॥
कां निवटलिया सूदलें विख । मुकियाचें बांधलें मुख । नाना नुठितां लेख । पुसिलें जैसें ॥ ७-७० ॥
तैसें अज्ञान आपुली वेळ । भोगी हेचि टवाळ । आतां तरी केवळ । वस्तु होऊनि नसे ॥ ७-७१ ॥
देखा वांझ कैसी विये ? । विरूढती भाजली बियें ? । कीं सूर्य कोण्हा लाहे । अंधारातें ? ॥ ७-७२ ॥
तैसा चिन्मात्रे चोखडा । भलतैसा अज्ञानाचा झाडा । घेतला तरी पवाडा । येईल काई ? ॥ ७-७३ ॥
जे सायेचिये चाडे । डहुळिजे दुधाचें भांडें। ते दिसे कीं विघडे । तैसें हें पां ॥ ७-७४ ॥
नाना नीद धरावया हातीं । चेउनी उठिला झडती । ते लाभे कीं थिती । नासिली होय ॥ ७-७५ ॥
तेवीं पाहावया अज्ञान ऐसें । हें आंगीं पिसें काइसें । न पाहतां आपैसें । न पाहणेंचि कीं ॥ ७-७६ ॥
एवं कोण्हेही परी । अज्ञानभावाची उजरी । न पडेचि नगरीं । विचाराचिये ॥ ७-७७ ॥
अहो कोण्हेही वेळे । आत्मा अथवा वेगळें । विचाराचे डोळे । देखते का ? ॥ ७-७८ ॥
ना निर्धाराचें तोंड न माखे । प्रमाण स्वप्नींही नाइके । कीं निरुती हन मुके । अनसाईपणा ॥ ७-७९ ॥
इतुलियाही भागु । अज्ञानाचा तरी तो मागु । निगे ऐसा बागु । पडतां कां देवा ॥ ७-८० ॥
अंवसेचेनि चंद्रबिंबें । निर्वाळिलिये शोभे । कां मांडलें जैसे खांबे । शशविषाणाचे ॥ ७-८१॥
नाना गगनौलाचिया माळा । वांजेच्या जालया गळा । घापती तो सोहळा । पाविजत असे ॥ ७-८२ ॥
आणून कांसवीचें तुप । भरू आकाशाचें माप । तरी साचा येती संकल्प । ऐसे ऐसे ॥ ७-८३ ॥
आम्हीं येऊनि जाऊनि पुढती । अज्ञान आणावें निरुती । तें नाहीं तरी किती । वतवतूं पां ॥ ७-८४ ॥
म्हणोनि अज्ञान अक्षरें । नुमसूं आतां निदसुरें । परी आन येक स्फुरे । इयेविषयीं ॥ ७-८५ ॥
आपणया ना आणिकातें । देखोनि होय देखतें । वस्तु ऐसिया पुरतें । नव्हेचि आंगें ॥ ७-८६ ॥
तरी ते आपणयापुढें । दृश्य पघळे येव्हडें । आपण करी फुडें । द्रष्टेपणें ॥ ७-८७ ॥
जेथ आत्मत्वाचें सांकडे । तेथ उठे हें येव्हडें । उठिलें तरी रोकडें । देखतसों ॥ ७-८८ ॥
न दिसे जरी अज्ञान । तरी आहे हें नव्हे आन । यया दृश्यानुमान । प्रमाण जालें ॥ ७-८९ ॥
ना तरी चंद्रु येक असे । तो व्योमीं दुणावला दिसे । तरी डोळां तिमिर ऐसें । मानूं ये कीं ॥ ७-९० ॥
भूमीवेगळीं झाडें । पाणी घेती कवणीकडे । न दिसती आणि अपाडें । साजीं असती॥ ७-९१ ॥
तरी भरंवसेनि मुळें । पाणी घेती हें न टळें । तैसें अज्ञान कळें । दृष्यास्तव ॥ ७-९२ ॥
चेइलिया नीद जाये । निद्रिता तंव ठाउवी नोहे । परी स्वप्न दाऊनि आहे । म्हणों ये कीं ॥ ७-९३ ॥
म्हणोन वस्तुमात्रें चोखें । दृश्य जरी येव्हडें फांके । तेव्हां अज्ञान आथी सुखें । म्हणों ये कीं ॥ ७-९४ ॥
अगा ऐसिया ज्ञानातें । अज्ञान म्हणणें केउतें । काय दिवो करी तयातें । अंधारु म्हणिपे ? ॥ ७-९५ ॥
अगा चंद्रापासून उजळ । जेणें राविली वस्तु धवळ । तयातें काजळ । म्हणिजतसे ॥ ७-९६ ॥
आगीचें काज पाणी । निफजा जरी आणी । अज्ञान इया वहणी । मानूं तरी तें ॥ ७-९७ ॥
कळीं पूर्ण चंद्रमा । आणून मेळवी अमा । तरी ज्ञान हें अज्ञान नामा । पात्र होईजे ॥ ७-९८ ॥
वोरसोनि लोभें । विष कां अमृतें दुभे । ना दुभे तरी लाभे । विषचि म्हणणें ॥ ७-९९ ॥
तैसा जाणणेयाचा वेव्हारू । जेथें माखला समोरु । तेथें आणिजे पुरू । अज्ञानाचा ॥ ७-१०० ॥
तया नांव अज्ञान ऐसें । तरी ज्ञान होआवें तें कैसें ? । येर्हवीं कांहींचि असे । आत्मा काई ? ॥ ७-१०१ ॥
कांहींच जया न होणें । होय तें स्वतां नेणे । तरी शून्याचीं देवांगणें । प्रमाणासी ॥ ७-१०२ ॥
असे म्हणावयाजोगें । नाचरे कीर आंगें । परी नाहीं हें न लागे । जोडावेंचि ॥ ७-१०३ ॥
कोणाचे असणेंनवीण असे । कोणी न देखतांचि दिसे । हें आथी तरी काईसें । हरतलेपण ॥ ७-१०४ ॥
मिथ्यावादाची कुटी आली । ते निवांतचि साहिली । विशेषाही दिधली । पाठी जेणें ॥ ७-१०५ ॥
जो निमालीही नीद देखे । तो सर्वज्ञ येवढें काय चुके ? । परी दृश्याचिये न टेके । सोईं जो ॥ ७-१०६ ॥
वेद काय काय न बोले । परी नांवचि नाहीं घेतलें । ऐसें कांहीं जोडिलें । नाहीं जेणें ॥ ७-१०७ ॥
सूर्यो कोणा न पाहे ? । परि आत्मा दाविला आहे ? । गगनें व्यापिता ठाये । ऐसी वस्तु ॥ ७-१०८ ॥
देह हाडांची मोळी । मी म्हणोनि पोटाळी । तो अहंकारु गाळी । पदार्थु हा ॥ ७-१०९ ॥
बुद्धि बोद्ध्या सोके । ते येव्हडी वस्तु चुके । मना संकल्प निके । याहीहुनि ॥ ७-११० ॥
विषयाची बरडी । अखंड घासती तोंडीं । तियें इंद्रियें गोडी । न घेपती हे ॥ ७-१११ ॥
परी नाहींपणासगट । खाऊनि भरिलें पोट । ते कोणाही सगट । कां फावेल ? ॥ ७-११२ ॥
जो आपणासी नव्हे विखो । तो कोणा लाहे देखो । जे वाणी न सके चाखों । आपणापें ॥ ७-११३ ॥
हें असो नामें रूपें । पुढां सुनि अमूपें । जेथें आलीच वासिपे । अविद्या हे ॥ ७-११४॥
म्हणोनि आपलेंचि मुख । पाहावयाची भूक । न वाणे मा आणिक । कें रिघेल ? ॥ ७-११५ ॥
नाडिले जें वादीकोडें । आंतुचि बाहेर सवडे । तैसा निर्णो सुनाथा पडे । केला जेथें ॥ ७-११६ ॥
कां मस्तकान्त निर्धारिली । जो छाया उडों पाहे आपुली । तयाची फांवली । बुद्धि जैसी ॥ ७-११७ ॥
तैसें टणकोनि सर्वथा । हे ते ऐसी व्यवस्था । करी तो चुके हाता । वस्तूचा जिये ॥ ७-११८ ॥
आतां सांगिजे तें केउतें । शब्दाचा संसारा नाहीं जेथें । दर्शना बीजें तेथे । जाणीव आणी ? ॥ ७-११९ ॥
जयाचेनि बळें । अचक्षुपण आंधळें । फिटोनि वस्तु मिळे । देखणी दशा ॥ ७-१२० ॥
आपुलेंचि दृश्यपण । उमसो न लाहे आपण । द्रष्टत्वा कीर आण । पडली असतां ॥ ७-१२१ ॥
कोणा कोण भेटे ? । दिठी कैंची फुटे ? । ऐक्यासकट पोटें । आटोनि गेलीं ॥ ७-१२२ ॥
येव्हढेंही सांकडें । जेणें सारोनि येकीकडे । उघडिलीं कवाडें । प्रकाशाचीं ॥ ७-१२३ ॥
दृश्याचिया सृष्टी । दिठीवरी दिठी । उठलिया तळवटीं । चिन्मात्रची ॥ ७-१२४ ॥
दर्शनऋद्धि बहुवसा । चिच्छेषु मातला ऐसा । जे शिळा न पाहे आरिसा । वेद्यरत्नाचा ॥ ७-१२५ ॥
क्षणीं क्षणीं नीच नवी । दृश्याची चोख मदवी । दिठीकरवीं वेढवी । उदार जे ॥ ७-१२६ ॥
मागिलिये क्षणीचीं अंगें । पारुसी म्हणोनियां वेगें । सांडूनि दृष्टि रिगे । नवेया रूपा ॥ ७-१२७ ॥
तैसीच प्रतिक्षणीं । जाणिवेचीं लेणीं । लेऊनि आणी । जाणतेपण ॥ ७-१२८ ॥
तया परमात्मपदीचें शेष । ना काहीं तया सुसास । आणि होय येव्हडी कास । घातली जेणें ॥ ७-१२९ ॥
सर्वज्ञतेची परी । चिन्मात्राचे तोंडवरी । परी तें आन घरीं जाणिजेना ॥ ७-१३० ॥
एवं ज्ञानाज्ञान मिठी । तेंही फांकतसे दिठी । दृश्यपणें ये भेटी । आपणपयां ॥ ७-१३१ ॥
तें दृश्य मोटकें देखें । आपण स्वयें दृष्टत्वें तोखे । तेंचि दिठीचेनि मुखें । माजीं दाटे ॥ ७-१३२ ॥
तेव्हां घेणें देणें घटे । परी ऐक्याचें सूत न तुटे । जेवीं मुखीं मुख वाटे । दर्पणें केलें ७-१३३ ॥
अंगें अंगवरी पहुडे । चेइला वेगळा न पडे । तया वारुवाचेनि पाडें । घेणें देणें ॥ ७-१३४ ॥
पाणी कल्लोळाचेनि मिसें । आपणपें वेल्हावे जैसें । वस्तु वस्तुत्वें खेळों ये तैसें । सुखें लाहे ॥ ७-१३५ ॥
गुंफिवा ज्वाळांचिया माळा । लेइलियाही अनळा । भेदाचिया आहाळां । काय पडणें आहे ? ॥ ७-१३६ ॥
किं रश्मीचेनि परिवारें । वेढुनि घेतला थोरें । तरी सूर्यासि दुसरें । बोलों येईल ? ॥ ७-१३७ ॥
चांदणियाचा गिंवसु । चांदावरी पडिलिया बहुवसु । काय केवळपणीं त्रासु । देखिजेल ? ॥ ७-१३८ ॥
दळाचिया सहस्रवरी । फांको आपुलिया परी । परी नाहीं दुसरी । भास कमळीं ॥ ७-१३९ ॥
सहस्रवरी बाहिया । आहाती सहस्रर्जुना राया । तरी तो काय तिया । येकोत्तरावा ? ॥ ७-१४० ॥
सौकटाचिया वोजा । पसरो कां बहू पुंजा । परी ताथुवीं दुजा । भाव आहे ? ॥ ७-१४१ ॥
कोडीवरी शब्दांचा । मेळावा घरीं वाचेचा । मीनला तर्ही वाचा । मात्र कीं ते ॥ ७-१४२ ॥
तैसे दृश्याचे डाखळे । नाना दृष्टीचे उमाळे । उठती लेखावेगळे । द्रष्टत्वेंचि ॥ ७-१४३ ॥
गुळाचा बांधा । फुटलिया मोडीचा धांदा । जाला तरी नुसधा । गूळचि कीं तो ॥ ७-१४४ ॥
तैसें हें दृश्य देखो । कीं बहू होऊनि फांको । परी भेदाचा नव्हे विखो । तेचि म्हणोनि ॥ ७-१४५ ॥
तया आत्मयाच्या भाखा । न पडेचि दुसरी रेखा । जर्ही विश्वा अशेखा । भरला आहे ॥ ७-१४६ ॥
दुबंधा क्षिरोदकीं । बाणें परी अनेकीं । दिसती तरी तितुकीं । सुतें आथी ? ॥ ७-१४७ ॥
पातयाचि मिठी । नुकलितां दिठी । अवघियाची सृष्टी । पाविजे जरी ॥ ७-१४८ ॥
न फुटतां बीजकणिका । माजीं विस्तारे वटु असिका । तरी अद्वैतफांका । उपमा आथी ॥ ७-१४९ ॥
मग मातें म्यां न देखावें । ऐसेही भरे हावें । तरी आंगाचिये विसवे । सेजेवरी ॥ ७-१५० ॥
पातयाचि मिठी । पडलिया कीजे दिठी । आपुलेचि पोटीं । रिगोनि असणें ॥ ७-१५१ ॥
कां नुदेलिया सुधाकरु । आपणपें भरे सागरु । ना कूर्मी गिली विस्तारु । आपेंआप ॥ ७-१५२ ॥
अवसेचिये दिवसीं । सतराविये अंशीं । स्वयें जैसें शशी । रिगणें होय ॥ ७-१५३ ॥
तैसें दृश्य जिणतां द्रष्टे । पडले जैताचिये कुटे । तया नांव वावटे । आपणपयां ॥ ७-१५४ ॥
सहजें आघवेंचि आहे । तरी कोणा कोण पाहे ? । तें न देखणेंचि आहे । स्वरूप निद्रा ॥ ७-१५५ ॥
नाना न देखणें नको । म्हणे मीचि मातें देखो । तरी आपेंआप विखो । अपैसें असे ॥ ७-१५६ ॥
जें अनादिच दृश्यपणें । अनादिच देखणें । हें आतां कायी कोणें । रचूं जावें ? ॥ ७-१५७ ॥
अवकाशेशीं गगना । गतीसीं पवना । कीं दीप्तीसीं तपना । संबंधु कीजे ? ॥ ७-१५८ ॥
विश्वपणें उजिवडे । तरी विश्व देखे फुडें । ना तें नाहीं तेव्हढें । नाहींची देखे ॥ ७-१५९ ॥
विश्वाचें असे नाहीं । विपायें बुडालियाही । तर्ही दशा ऐसिही । देखतचि असे ॥ ७-१६० ॥
कापुराहि आथी चांदिणें । कीं तोचि न माखे तेणें । तैसें केवळ देखणें । ठायें ठावो ॥ ७-१६१ ॥
किंबहुना ऐसें । वस्तु भलतिये दशे । देखतचि असे । आपणपयातें ॥ ७-१६२ ॥
मनोरथांचीं देशांतरें । मनीं प्रकाशून नरें । मग तेथें आदरें । हिंडे जैसा ॥ ७-१६३ ॥
कां दाटला डोळा डोळ्यां । डोळा चितारा होऊनियां । स्फुरे चोख म्हणौनियां । विस्मो नाहीं ॥ ७-१६४ ॥
यालागीं एकें चिद्रूपें । देखिजे कां आरोपे । आपणयां आपणपें । काय काज ? ॥ ७-१६५ ॥
किळेचें पांघरुन । आपजवी रत्न कोण ? । कीं सोने ले सोनें पण । जोड जोडूं ? ॥ ७-१६६ ॥
चंदन सौरभ वेढी ? । कीं सुधा आपणया वाढी ? । कीं गूळ चाखे गोडी ? । ऐसें आथी हें ? ॥ ७-१६७ ॥
कीं उजाळाचे किळे । कापुरा पुटीं दिधलें ? । कीं ताऊन ऊन केलें । आगीतें काई ? ॥ ७-१६८ ॥
ना ना ते लता । आपुले वेली गुंडाळितां । घर करी न करितां । जयापरी ॥ ७-१६९ ॥
कां प्रभेचा उभला । दीपप्रकाश संचला । तैसा चैतन्यें गिंवसला । चिद्रूप स्फुरे ॥ ७-१७० ॥
ऐसें आपणया आपण । आपुलें निरीक्षण । करावें येणेंवीण । करितुचि असे ॥ ७-१७१ ॥
ऐसें हें देखणें न देखणें । हें आंधरें चांदिणें । मा चंद्रासि उणें । स्फुरतें का ? ॥ ७-१७२ ॥
म्हणोनि हें न व्हावे । ऐसेंही करूं पावे । तरी तैसाचि स्वभावें । आयिता असे ॥ ७-१७३ ॥
द्रष्टा दृश्य ऐसें । अळुमाळु दोनी दिसे । तेंही परस्परानुप्रवेशें । कांहीं ना कीं ॥ ७-१७४ ॥
तेथें दृश्य द्रष्टां भरे । । द्रष्टेपण दृश्यीं न सरे । मा दोन्ही न होनि उरे । दोहींचें साच ॥ ७-१७५ ॥
मग भलतेथ भलतेव्हां । माझारीले दृश्य-द्रष्टाभावा । आटणी करीत खेंवा । येती दोन्ही ॥ ७-१७६ ॥
कापुरीं अग्निप्रवेशु । कीं अग्नि घातला पोतासु । ऐसें नव्हे संसरिसु । वेंचु जाला ॥ ७-१७७ ॥
येका येकु वेंचला । शून्य बिंदु शून्यें पुसिला । द्रष्टा दृश्याचा निमाला । तैसें होय ॥ ७-१७८ ॥
किंबहुना आपुलिया । प्रतिबिंबा झोंबिनलिया । झोंबीसकट आटोनियां । जाईजे जेवीं ॥ ७-१७९ ॥
तैसें रुसता दृष्टी । द्रष्टा दृश्य भेटी । येती तेथें मिठी । दोहींची पडे ॥ ७-१८० ॥
सिंधु पूर्वापर । न मिळती तंवचि सागर । मग येकवट नीर । जैसें होय ॥ ७-१८१ ॥
बहुये हें त्रिपुटी । सहजें होतया राहटी । प्रतिक्षणीं काय ठी । करीतसे ? ॥ ७-१८२ ॥
दोनी विशेषें गिळी । ना निर्विशिष्टातें उगळी । उघडीझांपी येकेंच डोळीं । वस्तुचि हे ॥ ७-१८३ ॥
पातया पातें मिळे । कीं दृष्ट्ट्त्वें सैंघ पघळे । तिये उन्मळितां मावळे । नवलावो हा ॥ ७-१८४ ॥
द्रष्टा दृश्याचा ग्रासी । मध्यें लेखु विकासी । योगभूमिका ऐसी । अंगीं वाजे ॥ ७-१८५ ॥
उठिला तरंगु बैसे । पुढें आनुही नुमसे । ऐसा ठाईं जैसे । पाणी होय ॥ ७-१८६ ॥
कां नीद सरोनि गेली । जागृती नाहीं चेयिली । तेव्हां होय आपुली । जैसी स्थिति ॥ ७-१८७ ॥
नाना येका ठाऊनि उठी । अन्यत्र नव्हे पैठी । हे गमे तैशिया दृष्टी । दिठी सुतां ॥ ७-१८८ ॥
कां मावळो सरला दिवो । रात्रीचा न करी प्रसवो । तेणें गगनें हा भावो । वाखाणिला ॥ ७-१८९ ॥
घेतला स्वासु बुडाला । घापता नाहीं उठिला । तैसा दोहींसि सिवतला । नव्हे जो अर्थु ॥ ७-१९० ॥
कीं अवघांचि करणीं । विषयांची घेणी । करितांचि येके क्षणीं । जें कीं आहे ॥ ७-१९१ ॥
तयासारिखा ठावो । हा निकराचा आत्मभावो । येणें कां पाहों । न पाहों लाभे ? ॥ ७-१९२ ॥
कायी आपुलिये भूमिके । आरिसा आपुलें निकें । पाहों न पाहों शके । हें कें आहे ? ॥ ७-१९३ ॥
कां समोर पाठिमोरिया । मुखें होऊं ये आरिसिया । वांचूनि तयाप्रति तया । होआवें कां ? ॥ ७-१९४ ॥
सर्वांगें देखणा रवी । परी ऐसें घडे कवीं । जे उदोअस्तूंचीं चवी । स्वयें घेपे ? ॥ ७-१९५ ॥
कीं रसु आपणिया पिये ? । कीं तोंड लपऊनि ठाये ? । हें रसपणें नव्हे । तया जैसें ॥ ७-१९६ ॥
तैसें पाहणें न पाहणें । पाहणेंपणेंचि हा नेणे । आणि दोन्ही हें येणें । स्वयेंचि असिजे ॥ ७-१९७ ॥
जें पाहणेंचि म्हणौनियां । पाहणें नव्हे आपणयां । तैं न पाहणें आपसया । हाचि आहे ॥ ७-१९८ ॥
आणि न पाहणें मा कैसें । आपणपें पाहों बैसे ? । तरी पाहणें हें ऐसें । हाचि पुढती ॥ ७-१९९ ॥
हीं दोन्ही परस्परें । नांदती एका हारें । बांधोनि येरयेरें । नाहीं केलें ॥ ७-२०० ॥
पाहाणया पाहणें आहे । तरी न पाहणें हेंचि नोहे । म्हणौनि याची सोये । नेणती दोन्ही ॥ ७-२०१ ॥
एवं पाहणें न पाहणें । चोरूनियां असणें । ना पाहे तरी कोणें । काय पाहिलें ? ॥ ७-२०२ ॥
दिसत्यानें दृश्य भासे । म्हणावें ना देखिलें ऐसें । तरी दृश्यास्तव दिसे । ऐसें नाहीं ॥ ७-२०३ ॥
दृश्य कीर दृष्टीसी दिसे । परी साच कीं द्रष्टा असे । आतां नाहीं तें कैसें । देखिलें होये ? ॥ ७-२०४ ॥
मुख दिसो कां दर्पणीं । परी असणें कीं तये मुखपणीं । तरी जाली ते वायाणी । प्रतीति कीं ॥ ७-२०५ ॥
देखतांची आपणयातें । आलिये निदेचेनि हातें । तया स्वप्ना ऐसा येथें । निहाळितां ॥ २०६ ॥
निद्रिस्तु सुखासनीं । वाहिजे आनु वाहणीं । तो साच काय तेसणी । दशा पावे ? ॥ ७-२०७ ॥
कीं सिसेंवीण येक येकें । दाविलीं राज्य करिती रंकें । तैसींचि तियें सतुकें । आथी काई ? ॥ २०८ ॥
ते निद्रा जेव्हां नाहीं । तेव्हां जो जैसा जिये ठाई । तैसाची स्वप्नी कांहीं । न पविजेचि कीं ॥ ७-२०९ ॥
तान्हेलया मृगतृष्णा । न भेटलेया शिणु जेसणा । मा भेटलेया कोणा । काय भेटलें ॥ ७-२१० ॥
कीं साउलीचेनि व्याजें । मेळविलें जेणें दुजे । तयाचें करणें वांझें । जालें जैसें ॥ ७-२११ ॥
तैसें दृश्य करूनियां । द्रष्ट्यातें द्रष्ट्या । दाऊनि धाडिलें वाया । दाविलेपणही ॥ ७-२१२ ॥
जें दृश्य द्रष्टाचि आहे । मा दावणें कां साहे ? । न दाविजे तरी नोहे । तया तो काई ? ॥ ७-२१३ ॥
आरिसा पां न पाहे । तरी मुखचि वाया जाये ? । तेणेंवीण आहे । आपणपें कीं ॥ ७-२१४ ॥
तैसें आत्मयातें आत्मया । न दाविजे पैं माया । तरी आत्मा वावो कीं वायां । तेचि कीं ना ? ॥ ७-२१५ ॥
म्हणोनि आपणापें द्रष्टा । न करितां असें पैठां । आतां जालाचि दिठा । कां न करावा ॥ ७-२१६ ॥
नाना मागुतें दाविलें । तरी पुनरुक्त जालें । येणेंहि बोलें गेलें । दावणें वृथा ॥ ७-२१७ ॥
दोरासर्पाभासा । साचपणें दोरु कां जैसा । द्रष्टा दृश्या तैसा । द्रष्टा साचु ॥ ७-२१८ ॥
दर्पणें आणि मुखें । मुख दिसे हें न चुके । परी मुखीं मुख सतुकें । दर्पणीं नाहीं ॥ ७-२१९ ॥
तैसे द्रष्टा दृश्या दोहों । साच कीं देखता ठावो । म्हणौनि दृश्य तें वावो । देखिलें जर्ही ॥ ७-२२० ॥
वावो कीर होये । तर्ही दिसत तंव आहे । येणें बोलें होये । आथी ऐसें ॥ ७-२२१ ॥
तरी आन आनातें । देखोन होय देखतें । तरी मानूं येतें देखिलें ऐसें ॥ ७-२२२ ॥
येथें देखोनि कां न देखोनि । ऐक्य कां नाना होऊनि । परि हा येणेंवाचूनि । देखणें असे ? ॥ ७-२२३ ॥
आरिशानें हो कां दाविलें । तरी मुखचि मुखें देखिलें । तो न दावी तरी संचलें । मुखचि मुखीं ॥ ७-२२४ ॥
तैसें दाविलें नाहीं । तरी हाचि ययाचा ठाईं । ना दाविला तरीही । हाचि यया ॥ ७-२२५ ॥
जागृती दाविला । कां निदा हारविला । परी जैसा येकला । पुरुषपुरुषीं ॥ ७-२२६ ॥
कां रायातें तूं रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो । तर्ही ठायें ठावो । राजाचि असे ॥ ७-२२७ ॥
ना तरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया । तर्ही कांहीं उणें तया । माजी असे ? ॥ ७-२२८ ॥
तैसें दावितां न दावितां । हा ययापरौता । चढे न तुटे आईता । असतचि असे ॥ ७-२२९ ॥
तरी कां निमित्य पिसें । हा यया दाऊं बैसें । देखतें नाहीं तैं आरिसे । देखावे कोणें ? ॥ ७-२३० ॥
दीपु दावी तयातें रची । कीं तेणेंची सिद्धि दीपाची । तैसी सत्ता निमित्ताची । येणें साच ॥ ७-२३१ ॥
वन्हीतें वन्हीशिखा । प्रकाशी कीर देखा । परी वन्ही न होनि लेखा । येईल काई ? ॥ ७-२३२ ॥
आणि निमित्त जें बोलावें । तें येणें दिसोनि दावावें । देखिलें तरी स्वभावें । दृश्यही हा ॥ ७-२३३ ॥
म्हणौनि स्वयंप्रकाशा यया । आपणापें देखावया । निमित्त हा वांचुनियां । नाहींच मा ॥ ७-२३४ ॥
भलतेन विन्यासें । दिसत तेणेंची दिसे । हा वांचून नसे । येथें कांहीं ॥ ७-२३५ ॥
लेणें आणि भांगारें । भांगारचि येक स्फुरे । कां जे येथें दुसरें । नाहींचि म्हणोनि ॥ ७-२३६ ॥
जळ तरंगीं दोहीं । जळावांचूनि नाहीं । म्हणौनि आन कांहीं । नाहीं ना नोहे ॥ ७-२३७ ॥
हो कां घ्राणानुमेयो । येवो कां हातीं घेवो । लाभो कां दिठी पाहों । भलतैसा ॥ ७-२३८ ॥
परी कापुराच्या ठाईं । कापुरावांचूनि नाहीं । तैशा रीती भलतयाही । हाचि यया ॥ ७-२३९ ॥
आतां दृश्यपणें दिसो । कीं द्रष्टा होऊनि असो । परी हां वांचूनि अतिसो । नाहीं येथें ॥ ७-२४० ॥
गंगा गंगापणें वाहो । कीं सिंधु होऊनि राहो । परी पाणीपणा नवलाहो । हें न देखो कीं ॥ ७-२४१ ॥
थिजावें कीं विघरावें । हें अप्रयोजक आघवें । घृतपण नव्हे । अनारिसें ॥ ७-२४२ ॥
ज्वाळा आणि वन्हि । न लेखिजती दोन्ही । वन्हिमात्र म्हणोनि । आन नव्हेचि कीं ॥ ७-२४३ ॥
तैसें द्रश्य कां द्रष्टा । या दोन्ही दशा वांझटा । पाहतां येकी काष्ठा । स्फूर्तिमात्र तो ॥ ७-२४४ ॥
इये स्फूर्तीकडुनी । नाहीं स्फुर्तिमात्रवांचुनि । तरी काय देखोनि । देखतु असे ? ॥ ७-२४५ ॥
पुढें फरकें ना दिसतें । ना मगें डोकावी देखतें । पाहतां येणें ययातें । स्फुरद्रुपेंचि ॥ ७-२४६ ॥
कल्लोळें जळीं घातलें । सोनेंनि सोनें पांघुरलें । दिठीचे पाय गुंतले । दिठीसीचि ॥ ७-२४७ ॥
श्रुतीसि मेळविली श्रुती । दृतीसि मेळविली दृती । कां जे तृप्तीसीचि तृप्ति । वेगारिली ॥ ७-२४८ ॥
गुळें गुळ परवडिला । मेरु सुवर्णें मढिला । कां ज्वाळा गुंडाळिला । अनळु जैसा ॥ ७-२४९ ॥
हें बहु काय बोलिजे । कीं नभ नभाचिया रिगे सेजे । मग कोणें निदिजे । मग जागे तें कोणें ॥ ७-२५० ॥
हा येणें पाहिला आइसा । कांहीं न पाहिला जैसा । आणि न पाहतांहि अपैसा । पाहणेंचि हा ॥ ७-२५१ ॥
येथें बोलणें न साहे । जाणणें न समाये । अनुभऊ न लाहे । अंग मिरौ ॥ ७-२५२ ॥
म्हणोन ययातें येणें । ये परीचें पाहणें । पाहतां कांहीं कोणे । पाहिलें नाहीं ॥ ७-२५३ ॥
किंबहुना ऐसें । आत्मेनि आत्मा प्रकाशे । न चेतुचि चेऊं बैसे । जयासि तो ॥ ७-२५४ ॥
स्वयें दर्शनाचिया सवा । अवघियाची जात फावां । परी निजात्मभावा । न मोडिताही ॥ ७-२५५ ॥
न पाहतां आरिसा असो पाहे । तरी तेंचि पाहणें होये । आणि पाहणेन तरी जाये । न पाहणें पाहणें ॥ ७-२५६ ॥
भलतैसा फांके । परी येकपणा न मुके । नाना संकोचे तरी असकें । हाचि आथी ॥ ७-२५७ ॥
सूर्याचिया हाता । अंधकारू नये सर्वथा । मा प्रकाशाची कथा । आईकता का ? ॥ ७-२५८ ॥
अंधारु कां उजिवडु । हा एकला येकवडु । जैसा कां मार्तंडु । भलतेथें ॥ ७-२५९ ॥
तैसा आवडतिये भूमिके । आरूढलियाही कौतुकें । परि ययातें हा न चुके । हाचि ऐसा ॥ ७-२६० ॥
सिंधूची सींव न मोडे । पाणीपणा सळु न पडे । जरी मोडूत गाडे । तरंगांचे ॥ ७-२६१ ॥
रश्मि सूर्यींच आथी । परी बिंबाबहेरी जाती । म्हणौनि बोधसंपत्ती । उपमा नोहे ॥ ७-२६२ ॥
आणि पळहेच दोडा । न पडतां तढा । जग तंव कापडा । न भरेचि कीं ॥ ७-२६३ ॥
सोनयाचा रवा । रवेपणाचा ठेवा । अवघेयाचि अवयवा । लेणें नोहे ॥ ७-२६४ ॥
न फेडितां आडवावो । दिगंतौनि दिगंता जावो । न ये मा पावों । उपमा काई ? ॥ ७-२६५ ॥
म्हणौनि इये आत्मलीळे । नाहीं आन कांटाळें । आतां ययाचिये तुळे । हाचि यया ॥ ७-२६६ ॥
स्वप्रकाशाचा घांसीं । जेवितां बहु वेगेंसी । वेंचेना परी कुसीं । वाखही न पडे ॥ ७-२६७ ॥
ऐसा निरुपमापरी । आपुलिये विलासवरी । आत्मा राणीव करी । आपुला ठाईं ॥ ७-२६८ ॥
तयातें म्हणिपें अज्ञान । तरी न्याया भरलें रान । आतां म्हणे तयाचें वचन । उपसावों आम्ही ॥ ७-२६९ ॥
प्रकाशितें अज्ञान । ऐसें म्हणणें हन । तरी निधि दावितें अंजन । न म्हणिजे काई ? ॥ ७-२७० ॥
सुवर्णगौर अंबिका । न म्हणिजे कय काळिका ? । तैसा आत्मप्रकाशका । अज्ञानवादु ॥ ७-२७१ ॥
येर्हवीं शिवोनि पृथ्वीवरि । तत्त्वांच्या वाणेपरी । जयाचा रश्मिकरीं । उजाळा येती ॥ ७-२७२ ॥
जेणें ज्ञान सज्ञान होये । दृङ्मात्र दृष्टीतें विये । प्रकाशाचा दिवो पाहे । प्रकाशासी ॥ ७-२७३ ॥
तें कोणें निकृष्टें । दाविलें अज्ञानाचेनि बोटें । ना तमें सूर्य मोटे । बांधतां निकें ॥ ७-२७४ ॥
पूर्वी ज्ञानाक्षरी । वसतां ज्ञानाची थोरी । शब्दार्थाची उजरी । अपूर्व नव्हे कीं ? ॥ ७-२७५ ॥
लाखेचे मांदुसे । आगीचें ठेवणें कायिसें ? । आंतु बाहेरी सरिसें । करून घाली ॥ ७-२७६ ॥
म्हणोनि जग ज्ञानें स्फितें । बोलतां अज्ञानवादातें । विखुरली होती आतें । वाचेचिये ॥ ७-२७७ ॥
आखरीं तंव गोवधु । पुधारां अनृतवादु । मा कैसा अज्ञानवादु । कीजे ज्ञानीं ? ॥ ७-२७८ ॥
आणि अज्ञान म्हणणें । स्फुरत्से अर्थपणें । आतां हेंचि ज्ञान कोणे । मानिजे ना ? ॥ ७-२७९ ॥
असो हें आत्मराजें । आपणापें जेणें तेजें । आपणचि देखिजे । बहुये परी ॥ ७-२८० ॥
निर्वचितां जें झावळे । तेंचि कीं लाहे डोळे ? । डोळ्यापुढें मिळे । तेंचि तया ॥ ७-२८१ ॥
ऐसें जगज्ञान जें आहे । तें अज्ञान म्हणें मी वियें । येणें अनुमानें हों पाहे । आथी ऐसें ॥ ७-२८२ ॥
तंव अज्ञान त्रिशुद्धि नाहीं । हें जगेंचि ठेविलें ठाई । जे धर्मधर्मित्वें कंहीं । ज्ञानाज्ञान असे ? ॥ ७-२८३ ॥
कां जळां मोतीं वियें ? । राखोंडिया दीपु जिये ? । तरी ज्ञानधर्मु होये । अज्ञानाचा ॥ ७-२८४ ॥
चंद्रमा निगती ज्वळा ? । आकाश आते शिळा ? । तरी अज्ञान उजळा । ज्ञानातें वमी ॥ ७-२८५ ॥
क्षीराब्धीं काळकूट । हे एकी परीचे विकट । परी काळकूटीं चोखट । सुधा कैंची ? ॥ ७-२८६ ॥
ना ज्ञानी अज्ञान जालें । तें होतांचि अज्ञान गेलें । पुढती ज्ञान येकलें । अज्ञान नाहीं ॥ ७-२८७ ॥
म्हणौनि सूर्य सूर्याचि येवढा । चंद्र चंद्राचि सांगडा । ना दिपाचिया पडिपाडा । ऐसा दीपु ॥ ७-२८८ ॥
प्रकाश तो प्रकाश कीं । यासि न वचे घेईं चुकी । म्हणौनि जग असकी । वस्तुप्रभा ॥ ७-२८९ ॥
विभाति यस्य भासा । सर्वमिदं हा ऐसा । श्रुति काय वायसा । ढेंकरू देती ॥ ७-२९० ॥
यालागीं वस्तुप्रभा । वस्तुचि पावे शोभा । जात असे लाभा । वस्तुचिया ॥ ७-२९१ ॥
वांचून वस्तु यया । आपणपें प्रकाशावया । अज्ञान हेतु वांया । अवघेंचि ॥ ७-२९२ ॥
म्हणोनि अज्ञान सद्भावो । कोण्हे परी न लाहों । अज्ञान कीर वावो । पाहों ठेलियाही ॥ ७-२९३ ॥
परी तमाचा विसुरा । न जोडेचि दिनकरा । रात्रीचिया घरा । गेलियाही ॥ ७-२९४ ॥
कां नीद खोळे भरिता । जागणें ही न ये हाता । येकलिया टळटळिता । ठाकिजे जेवीं ॥ ७-२९५ ॥


॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे अज्ञानखंडन नाम सप्तम प्रकरणं संपूर्णम् ॥